वॉशिंग्टन : अमेरिका-इराण युद्धाला एक महिना पूर्ण झाला, पण अद्यापही हे युद्ध थांबलेलं नाही. युद्ध थांबवण्याच्या हालचाली सुरू असून वाटाघाटीच्या चर्चा सुरू असल्याचं फक्त सांगितलं जात आहे. मात्र, दुसरीकडे इराणवरील हल्ले अद्यापही सुरूच आहेत. 28 फेब्रुवारीपासून पेटलेल्या या युद्धाची धग अद्यापही धुमसत असल्याने याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर होत आहे.
अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी अमेरिकेला उद्देशून 18 मिनिटांचं महत्त्वपूर्ण भाषण केलं. मात्र, त्यांच्या भाषणानंतर हे युद्ध थांबणार की पुन्हा भडकणार? याबाबतचा संभ्रम निर्माण झाला आहे. असं असतानाच अमेरिका आणि इस्रायलने पुन्हा एकदा संयुक्त हल्ला करत पश्चिम आशियातील सर्वात उंच पुलांपैकी एक असलेल्या इराणमधील कराज येथील एक पूल उद्ध्वस्त केला आहे.
त्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत इराणला पुन्हा एकदा मोठा इशारा दिला आहे. खूप उशीर होण्यापूर्वी इराणने करार करावा. इराण अजूनही एक महान राष्ट्र बनू शकतं. पण काहीही शिल्लक न राहण्याआधी आता करार करण्याची वेळ आली आहे, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
ट्रम्प यांनी शेअर केला इराणवरील हल्ल्याचा व्हिडीओ
इराणची राजधानी तेहरानला पश्चिमेकडील करज शहराशी जोडणाऱ्या महामार्गावरील एका मोठ्या पुलावर अमेरिकेने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात दोन जण ठार झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावर या हल्ल्याचा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये त्या पुलाचं मोठं नुकसान झाल्याचं दिसत आहे.
इराण युद्धाबाबत अद्यापही साशंकता कायम
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धाची ठिगणी पडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाचे विधान केले होते. इराणबरोबरचा आमचा संघर्ष चार ते पाच आठवडे सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. यादरम्यान युद्धाला पाच आठवडे पूर्ण होण्यास अवघ्या दोन दिवसांचा अवधी उरला आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेची लष्करी उद्दिष्टे लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. पुढील दोन ते तीन आठवड्यांत अमेरिकेकडून इराणवर आणखीनच तीव्र हल्ले केले जातील. त्यांच्या या विधानामुळे पश्चिम आशियात भडकलेले युद्ध सुमारे आठ आठवड्यांपर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ इराण आणि संपूर्ण जगाला एका दीर्घकालीन संघर्षासाठी तयार राहावे लागणार आहे. युद्धाची ठिणगी पडल्यानंतर हा संघर्ष दीर्घकाळ चालणार, अशी अपेक्षा कोणीही केली नव्हती. सध्याच्या युद्धाचा कालावधी किती कमी आहे हे पटवून देण्यासाठी ट्रम्प यांनी अमेरिकेने भूतकाळात लढलेल्या मोठ्या युद्धांचा दाखला दिला. त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीची या युद्धाशी तुलना केली.